कवठे येमाईत ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर सापडला

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरूर) येथील माळीवस्ती-इनामवस्ती परिसरातील खार ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवार (दि २४) सकाळी १० वाजता घडली होती. या तरुणाच्या मृतदेहाचा तब्बल ४८ तासांनंतर शोध लागला असुन तो ओढ्यात ज्या ठिकाणी पाय घसरुन पडला तिथंच खड्यात कपारीला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

 

राजेंद्र विक्रम कोळी (वय २५) असे या मयत तरुणाचे नाव असून तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. राजेंद्र विजेचे खांब उभे करण्याचे काम करत होता.पाऊस सुरु असल्यामुळे काम बंद होते. त्यामुळे त्याच्या एका साथीदारासह दोघे ओढ्याकडे आले होते. ओढ्याला पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चालू होते. राजेंद्र उडी मारत असताना घसरुन पडल्याचे त्याच्या साथीदाराने सांगितले. तो पडला तिथेच खड्ड्यात कपारीला अडकल्याने त्याचा मृतदेह तिथेच अडकून बसला होता.

 

शिरुर येथील महसूल व पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या पथंकाने स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांसह रविवारी शोधमोहीम राबविली होती. मात्र शोध न लागल्याने तपास कार्य थांबविण्यात आले. मंगळवारी (दि.२६) सकाळी ओढ्याचे पाणी कमी झाले म्हणून येथील पोलीस पाटील गणेश पवार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता कपारीत मृतदेह अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

त्यांनी तात्काळ पोलिसांत माहिती कळविली. तसेच यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे पथक शोधकार्यासाठी हजर झाले होते. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शिरुरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद शिंदे, विष्णू दहिफळे यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शिरुर येथे पाठविला.

शिरुर तालुक्यात उडी मारताना पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडून तरुण बेपत्ता