शिरूर, दि. ६ (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील कामाठीपुरा परिसरात एका महिलेला घरगुती काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत महिलेचे नाव मीना चंद्रशेखर गुप्ता (वय ४०, रा. कामाठीपुरा, शिरूर) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (दि. ५) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता, मीना गुप्ता या नेहमीप्रमाणे घरातील नळाचे पाणी भरण्यासाठी मोटार चालू करत होत्या. यावेळी त्यांना अचानक विजेचा झटका बसला आणि त्या जागेवरच कोसळल्या.
कुटुंबातील सदस्यांनी तातडीने त्यांना माणिकचंद हॉस्पिटल शिरूर येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी मृत्यूची नोंद ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४५ वा. केली.या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा प्रमोद चंद्रशेखर गुप्ता (वय २५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली असून, यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार राऊत करत आहे.या दुर्दैवी घटनेमुळे गुप्ता कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी नागरिकांनी घरगुती वीज उपकरणे हाताळताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंतापदी शरद माने यांनी केले आहे.