ठाणे: जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने ठाण्यात एक खास छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया आणि शटर अँड लाईट क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
हे प्रदर्शन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार प्रफुल गांगुर्डे यांच्या निवडक छायाचित्रांचे असणार आहे. यामध्ये विविध विषयांवर त्यांनी क्लिक केलेली उत्कृष्ट छायाचित्रे पाहता येतील. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज सुमन शिवाजी सानप आणि पर्यावरण अभ्यासक तथा वृक्षपुरुष विजयकुमार कट्टी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. हे छायाचित्र प्रदर्शन दि.19 ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, टेरेस गार्डन, एसबीआय बँकेच्या वर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, ठाणे (पश्चिम) या ठिकाणी नागरिकांसाठी आणि छायाचित्रप्रेमींसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने वृत्तपत्र छायाचित्रकारांचा सत्कार आणि कार्यशाळेचे ही आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात, ठाणे शहरात गेल्या 15 वर्षांपासून वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेल्या छायाचित्रकारांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय, शुक्रवार, दि.22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता ‘छायाचित्रणाचे तंत्र आणि माहिती’ या विषयावर एक मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘शटर अँड लाईट क्रिएशन्स’ च्या माध्यमातून ही कार्यशाळा होईल. यात छायाचित्रणाचे मूलभूत तंत्र शिकायला मिळेल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक गुगल फॉर्म लिंक लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. या प्रदर्शनाला आणि कार्यशाळेला विद्यार्थी, नागरिक, आणि छायाचित्रप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.