ठाणे: शहरातील धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला. बीएसयुपी घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या १०० रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला.
धर्मवीर नगर मधील बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झाला आहे. या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावर पोट असून छोटेमोठे काम किंवा व्यवसाय करतात. अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून ५४ हजार ते १ लाख ३४ हजार पर्यंत अधिभार सोसावा लागणार होता. मात्र या निर्णयामुळे प्रतीदस्त १०० रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे.
युवा सेना कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिला. यावेळी धर्मवीर नगर मध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. तसेच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले, तसेच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनीनकडून व्यक्त केली. तसेच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विनम्रपणे स्वीकार केला. या निर्णयाचा फायदा ठाण्यातील बीएसयुपी आणि जे. एन. यू. आर. एम च्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या ६ हजार ३४३ गरीब कुटुंबांना होणार आहे.