मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकताच ज्ञानदाचा हर्षद आत्माराम याच्याशी साखरपुडा पार पडला असून, या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी पहिल्यांदाच सविस्तरपणे भाष्य केलं आहे.ज्ञानदा आणि हर्षद यांनी राजश्री मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या प्रेमकथेमागची वाटचाल, घरातून होकार मिळवण्यासाठी केलेली प्रतीक्षा आणि त्यामागची कारणं उलगडली.
ज्ञानदा म्हणाली,“हर्षदने त्याच्या घरी आधीच सांगितलं होतं. मी मात्र घरी सांगायला थोडा वेळ घेतला. बाहेरून काहीही कळू नये, आपणच योग्य वेळी सांगायचं, हे दोघांचं ठरलेलं होतं. दोन्ही कुटुंबांचा पूर्ण होकार मिळाल्याशिवाय लग्न करायचं नाही, हे आम्ही ठामपणे ठरवलं होतं.”हर्षदनेही या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली.
View this post on Instagram
“या लग्नासाठी कुणीतरी मनापासून तयार नाही, हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळे आम्ही घाई न करता खूप संयम ठेवला. शेवटी सगळं जुळून आलं.”साखरपुड्याच्या प्रसंगाविषयी बोलताना ज्ञानदाने भावनिक आठवण सांगितली.“अंगठी घालताना आई शांत होती, पण बाबा मात्र रडत होते. त्या क्षणी हर्षद त्यांना समजवायला गेला. बाबांनी मला सांगितलं होतं‘अजून वेळ घे, फायनल ठरेल तेव्हा सांग, हर्षदनेही यावेळी पाठिंबा दिल्याचं सांगितलं.“जोपर्यंत सगळे तयार होत नाहीत, तोपर्यंत लग्न करायचं नाही. तोपर्यंत करिअरवर आणि सेटल होण्यावर लक्ष द्यायचं, असं आम्ही ठरवलं.”
ज्ञानदाने स्पष्ट केलं की तिच्या आई-वडिलांना या नात्याला होकार द्यायला दोन वर्षांचा कालावधी लागला. यामागचं कारण सांगताना हर्षद म्हणाला,“आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये सांस्कृतिक फरक आहे. समाजाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. पण माझ्यासाठी महत्त्वाचं हे होतं की माणूस म्हणून आपण योग्य आहोत का? जात हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता, मात्र काही लहानसहान गोष्टींवर चर्चा झाली.”संयम, समजूतदारपणा आणि परस्पर आदराच्या जोरावर ज्ञानदा–हर्षदचं नातं अधिक भक्कम झालं असून, त्यांच्या प्रामाणिक भूमिकेचं चाहते कौतुक करत आहेत.