‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’! शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकारणाचा थरार ६ फेब्रुवारीपासून रुपेरी पडद्यावर

महाराष्ट्र

मुंबई: मराठी ऐतिहासिक चित्रपटसृष्टीत आणखी एक भव्य आणि उत्कंठावर्धक पर्व दाखल होत असून, ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक ऐतिहासिक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आणि ऐतिहासिक आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ एक कथा नसून, शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा थरारक अध्याय मांडतो.

पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. भव्य सेट्स, अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी पटकथेच्या जोरावर हा चित्रपट इतिहास जिवंत करत असल्याचं चित्र दिसत आहे.

या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पुनीत इस्सर एका अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली व्यक्तिरेखेत दिसणार असून, त्यांच्या भारदस्त आणि अनुभवी अभिनयामुळे या भूमिकेला एक वेगळंच परिमाण लाभलं आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ सत्तेचं प्रतीक नसून, कूटनीती, रणनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.

महाभारत मालिकेतील दुर्योधन या गाजलेल्या भूमिकेसह अनेक संस्मरणीय पात्रांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या चित्रपटातून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसणार आहेत.

सशक्त कलाकारांचा अभिनय, भव्य दृश्यरचना आणि ऐतिहासिक घटनांची ताकदीने मांडणी यामुळे ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरणार असल्याचं चित्रपटप्रेमींमध्ये चर्चेत आहे.