मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. पक्षातील तब्बल ३० आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी विनंती करणारे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे.
अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर शरदचंद्र पवार गटाकडून विलीनीकरणाचे मौखिक पुरावे सादर केले जात असताना, ही घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासाठी दुसरा मोठा राजकीय हादरा मानली जात आहे.
विशेष म्हणजे, शनिवारी विधान भवनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड प्रक्रिया सुरू असतानाच, त्याच दिवशी काही आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या विनंतीपत्रावर सह्या गोळा करण्यास सुरुवात केली होती. हे पत्र सोमवारी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे अधिकृतरीत्या सादर करण्यात आले आहे.
या पत्रावर केवळ आमदारच नव्हे, तर पक्षाच्या युवक, विद्यार्थी, सांस्कृतिक तसेच विविध सेलच्या अध्यक्षांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आमदारांच्या पत्रातील ठळक मुद्दे
पत्रात नमूद करण्यात आले आहे की,“अजितदादा पवार यांच्या निधनामुळे पक्षावर मोठा आघात झाला आहे. अशा कठीण काळात पक्षाला संघटित ठेवण्यासाठी शांत, सक्षम आणि विश्वासार्ह नेतृत्वाची नितांत गरज आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून पक्ष व महाराष्ट्राप्रती आपली निष्ठा सिद्ध केली आहे. त्यांचा अनुभव, पक्षाशी असलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पूर्णपणे योग्य आहेत.”या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील नेतृत्वाची दिशा आणि संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.