मोठी कारवाई! वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी निलंबित

क्राईम

नवी मुंबई: नवी मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. फसवणुकीच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी न करता तो परस्पर दप्तरी दाखल करून संबंधित आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत केल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. युनूस कासम सोत आणि उमेश मनहरलाल उधानी यांच्यात भूखंड तडजोड कराराच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.

४ सप्टेंबर २०२५ रोजी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर तत्काळ गुन्हा दाखल न करता, तब्बल महिन्याभरानंतर ११ ऑक्टोबर २०२५ रोजी तो अर्ज परस्पर दप्तरी दाखल करण्यात आला. या गंभीर त्रुटीचा फायदा घेत संबंधित आरोपींनी बेलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवला.

याशिवाय, अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईकवाडी स्वतः न्यायालयात हजर न राहता दुय्यम अधिकाऱ्यास पाठवण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. हे वर्तन पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारे, बेजबाबदार आणि अनुचित ठरल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.