एमईएस कार्यालयात सीबीआयचा सापळा; दोन अधिकाऱ्यांना दोन लाखांची लाच घेताना अटक

क्राईम महाराष्ट्र

पुणे: खडकी येथील लष्करी अभियांत्रिकी सेवा कार्यालयात (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस – एमईएस) कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सुनील निकम (असिस्टंट गॅरिसन इंजिनिअर) आणि सुरेश म्हस्के (कनिष्ठ अभियंता) अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. अटकेनंतर सीबीआयने त्यांच्या घरांवर छापे टाकले असता मोठ्या प्रमाणावर रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

एमईएसमार्फत शहर व जिल्ह्यातील छावणी क्षेत्रातील बांधकामे, देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. निकम आणि म्हस्के यांच्याकडे कंत्राटदारांच्या बिलांना मंजुरी देण्याची जबाबदारी होती. याच कामासाठी त्यांनी एका ठेकेदाराकडे सहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. बिल मंजुरीसाठी वारंवार तगादा लावला जात असल्याने संबंधित ठेकेदाराने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची काही दिवस पडताळणी केल्यानंतर ती सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी सीबीआयने एमईएस कार्यालयात सापळा रचला. यावेळी सुरेश म्हस्के याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तपासात सुनील निकम याचाही सहभाग उघड झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.या कारवाईमुळे संरक्षण विभागाच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.