12 फेब्रुवारी भारत बंद! कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांचा देशव्यापी संप

महाराष्ट्र

बँका, वाहतूक सेवांवर परिणामाची शक्यता

नवी दिल्ली: देशातील विविध कामगार आणि शेतकरी संघटनांनी आज (12 फेब्रुवारी) भारत बंदचे आवाहन केले आहे. 10 केंद्रीय ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापारी करार, मनरेगातील बदल आणि इतर धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या बंदमुळे बँका, काही सरकारी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राज्यांमध्ये परिस्थितीनुसार शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाऊ शकतो.

बंदची प्रमुख कारणे काय?

भारत बंदमध्ये खालील 10 केंद्रीय ट्रेड युनियन सहभागी आहेत:

INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC.

या संघटनांचा आरोप आहे की केंद्र सरकारने आणलेल्या चार नवीन कामगार कायद्यांमुळे कामगारांचे हक्क कमी होणार आहेत. नोकरीची सुरक्षा कमी होईल, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल, तसेच किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत कामगारांवर अन्याय होऊ शकतो.

याशिवाय भारत-अमेरिका व्यापारी करार, खासगीकरणाची धोरणे आणि मनरेगामधील प्रस्तावित बदलांवरही संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

कर्मचारी संघटनांच्या मुख्य मागण्या

चारही नवीन कामगार कायदे रद्द करावेत

प्रस्तावित सीड बिल, विद्युत संशोधन बिल आणि SHANTI कायदा मागे घ्यावेत

मनरेगा अधिक मजबूत करावी

‘विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण) अधिनियम 2025’ रद्द करावा

खासगीकरण थांबवावे आणि सामाजिक सुरक्षा हमी द्यावी

काय बंद, काय सुरू?

बँका: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नाही.

शासकीय कार्यालये: काही ठिकाणी कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

सार्वजनिक वाहतूक: विशेषतः केरळ, कर्नाटक आणि ओडिसा या राज्यांमध्ये बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

शाळा-महाविद्यालये: अधिकृत सुट्टी जाहीर नाही; मात्र स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाऊ शकतो.

बाजारपेठा: काही शहरांमध्ये व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पाहता दुकाने बंद राहू शकतात.

देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रवास आणि बँक व्यवहारांचे नियोजन आधीच करून ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. विविध राज्यांमध्ये परिस्थितीनुसार बंदचा प्रभाव वेगवेगळा दिसू शकतो.