औंध-बोपोडी प्रभागात पहाटेच पाहणी
पुणे: पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला वेग देत अॅक्शन मोडमध्ये प्रवेश केला आहे. आज पहाटे ६ वाजताच त्यांनी औंध-बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर उतरून विविध नागरी समस्यांची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात त्यांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. २६ परिसर, पठाण चाळ, रेल्वे गेट, गांधी नगर, भोईटे चाळ तसेच मुंबई-पुणे रोडवरील गेट क्रमांक २० या भागांना भेटी देत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला.
यावेळी औंध वार्ड कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, ए.एस.आय. विनायक चोपडे, संतोष शेलार, मुकादम सोनम गायकवाड, सुपरवायझर पुरुषोत्तम कांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान ड्रेनेज लाईनची स्थिती, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची अवस्था, रस्त्यांची दुरवस्था तसेच पथदिव्यांबाबत नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची उपमहापौर वाडेकर यांनी सविस्तर दखल घेतली. या सर्व समस्यांवर तातडीने आणि प्रभावी कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नव्या पदावर रुजू झाल्यानंतर लगेचच प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्याने उपमहापौर वाडेकर यांच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.