मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून बिग बॉसने दिव्याची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, घराबाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
घरातून बाहेर पडताच तिच्या टीमकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली होती. “लवकरच सर्व सत्य समोर येईल,” असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने बिग बॉसच्या टीमवर थेट आरोप करत अनेक बाबींचा खुलासा केला.
निवडीपासूनच अटी ठेवल्याचा दावा
बिग बॉससाठी निवड कशी झाली? या प्रश्नावर दिव्या म्हणाली, “बिग बॉसची टीम माझ्याकडे आली होती. आमच्या तीन मिटिंग झाल्या. मी काही अटी ठेवल्या होत्या आणि त्यांनी त्या मान्य केल्या होत्या. मी माझ्या आजारपणाबद्दल त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. मला आरामासाठी वेळ मिळायला हवा, अशी माझी अट होती. त्यांनी पूर्ण काळजी घेऊ, असं आश्वासन दिलं होतं.”
आरोग्याबाबत गंभीर आरोप
पुढे बोलताना दिव्याने आरोग्याशी संबंधित धक्कादायक दावा केला. “माझी तब्येत खूप बिघडली होती. मरणाच्या दारात असताना दोन दिवसांनी मला इंजेक्शन देण्यात आलं. माझा ऑक्सिजनही कमी होत होता. तरीही योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत,” असा आरोप तिने केला.
फुटेजबाबतही प्रश्नचिन्ह
दिव्याने शोमध्ये दाखवलेल्या फुटेजवरही प्रश्न उपस्थित केला. “बिग बॉसने काही महत्त्वाचे फुटेज दाखवलेच नाहीत,” असा तिचा आरोप आहे. त्यामुळे शोच्या पारदर्शकतेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.दरम्यान, दिव्याच्या हकालपट्टीनंतर आणि ओमकार राऊत घराबाहेर गेल्यानंतर बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. राखीच्या आगमनानंतर घरातील वातावरणात वेगळीच रंगत आल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या बिग बॉसच्या घरात दिपाली सय्यद, सागर कारंडे, राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, सचिन कुमावत, तन्वी कोलते, आयुष संजीव, करण सोनावणे, प्रभु शेळके, रुचिता जामदार, अनुश्री माने, रोशन भजनकर आणि विशाल कोटियन हे स्पर्धक आहेत.दिव्याच्या आरोपांवर बिग बॉस किंवा संबंधित वाहिनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.