मी आधी नास्तिक होते! रिंकू राजगुरूचा केदारनाथातील अनुभव; एका घटनेनंतर बसला ‘त्या शक्ती’वर विश्वास

मनोरंजन

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरू गेली दहा वर्षे सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. सैराट या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू अभिनयासोबतच सोशल मीडियावरही स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

अलीकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील आध्यात्मिक प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. “मी आधी नास्तिक होते. पण केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. मात्र एक शक्ती आहे, यावर आता माझा विश्वास आहे,” असे ती म्हणाली.

केदारनाथची यात्रा आणि हेलिकॉप्टरचा प्रसंग

रिंकूने केदारनाथ मंदिर येथे घडलेला अनुभवही शेअर केला. गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी ती चालत केदारनाथला गेली. दर्शनानंतर परतीसाठी हेलिकॉप्टर मिळावे, अशी तिची इच्छा होती. मात्र तासन्‌तास प्रतीक्षा करूनही काहीच निश्चित होत नव्हते.“त्या त्रासात मी देवावरच प्रश्न उपस्थित केले. पण काही वेळातच दोन सीट उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आणि आम्हाला संधी मिळाली. आनंदात धावताना मी पडले आणि गुडघ्याला दुखापत झाली. तेव्हा मला जाणवलं की तक्रार करू नये. इतक्या लोकांपैकी आम्हालाच संधी मिळाली, यामागे काही तरी शक्ती आहे,” असे ती म्हणाली.

नव्या चित्रपटाची चर्चा

दरम्यान, रिंकूचा नुकताच प्रदर्शित झालेला पुन्हा एकदा साडे माडे तीन हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.रिंकूच्या या आध्यात्मिक अनुभवामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, तिच्या आयुष्यातील या बदलाची चर्चा रंगू लागली आहे.