प्रसिका’ जोडी संकटात! प्रसाद–दीपिका वेदपाठक यांची सर्व अकाउंट्स अचानक सस्पेंड

मनोरंजन

मुंबई: सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले मराठी इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक उर्फ ‘प्रसिका’ सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या सर्व व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंट्स सस्पेंड करण्यात आल्याने डिजिटल विश्वात खळबळ उडाली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून कंटेंट क्रिएशन क्षेत्रात सक्रिय असलेल्या या जोडीचे जेवण बनवतानाचे आणि लाइफस्टाइल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असत. विशेषतः Instagram वर त्यांचा मोठा चाहतावर्ग असून त्यांच्या रील्सना लाखो व्ह्यूज मिळत होते.

“१० वर्षांची मेहनत एका रात्रीत हिरावली” – प्रसाद वेदपाठक

अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर प्रसाद वेदपाठक यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केलेले नाही. तरीही आमची सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स अचानक गायब झाली. ही आमच्या १० वर्षांची मेहनत आहे, जी एका रात्रीत हिरावून घेतली गेली,” असे ते म्हणाले.त्यांचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांना पाठिंबा दिला जात आहे.

X वर भावनिक पोस्ट

प्रसाद यांनी एक्सवरही पोस्ट करत चिंता व्यक्त केली. “जर माझ्या किंवा माझ्या पत्नीचं काही बरं-वाईट झालं, तर याला फक्त सोशल मीडियाच जबाबदार असेल,” असे त्यांनी म्हटले आहे. या विधानानंतर प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

कारण अद्याप स्पष्ट नाही

सर्व अकाउंट्स अचानक का सस्पेंड करण्यात आली, याबाबत अधिकृत कारण समोर आलेले नाही. ‘प्रसिका’ जोडीकडून अकाउंट्स पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.दरम्यान, चाहत्यांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी ‘प्रसिका’ला पुन्हा प्लॅटफॉर्मवर आणण्याची मागणी केली आहे. पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.