मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये पाचव्या आठवड्यात मोठा धक्का बसला. एकाच आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेर जावं लागलं. करण सोनावणे आणि आयुष संजीव साळुंखे यांच्या एलिमिनेशननंतर घरातील समीकरणांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला.करण आणि प्राजक्ता शुक्ला यांच्यातील मैत्री या सिझनमध्ये विशेष चर्चेत होती. दोघांमधील केमिस्ट्री पाहून घरात प्रेमाचा बहर फुलणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. करणनेही घरात असताना प्राजक्ताप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र घराबाहेर पडताच करणने या नात्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“आमच्यात केवळ मैत्रीच…”
प्राजक्तासोबतच्या नात्याबद्दल बोलताना करण म्हणाला,“हे अपूर्ण आहे. कारण प्राजक्ता अजून घरात आहे. मी एकट्याने काहीही बोलणं योग्य नाही. आमचं नातं नेहमी निखळ मैत्रीचं होतं. मी घराबाहेर पडेपर्यंत आमच्यात फक्त मैत्री होती. घरातून बाहेर आल्यावर ‘एडिट’ या शब्दाचा अर्थ समजला. एका वाक्याचे दहा अर्थ काढले जातात. आम्हाला आणि आमच्या जवळच्या लोकांना माहिती आहे आम्ही काय आहोत. जगाला सांगण्याची गरज नाही.”
“मी स्वतःसाठी नाही, प्राजक्तासाठी रडलो”
करणने पुढे भावनिक होत सांगितलं की, “2020 साली मी प्रकाशझोतात आलो. त्यानंतर चार वर्षे काम केलं. या प्रवासात मला अशी व्यक्ती भेटली जिने माझं लॉजिक, मस्ती, मॅच्युरिटी-इममॅच्युरिटी सगळं स्वीकारलं. मला ते कनेक्शन जपायचं होतं. मी घरातून बाहेर पडताना स्वतःसाठी नाही, तर प्राजक्तासाठी रडलो. कारण आमचा आणि आयुषचा बॉण्ड तिच्यासाठी मेंटल स्ट्रेंथ होता.”
प्राजक्तासाठी खास सल्ला
प्राजक्ताच्या गेमबाबत बोलताना करण म्हणाला,“ती खूप इमोशनल आहे. घरात तिचा विश्वासघात होऊ शकतो. तिनं थोडं ‘इव्हिल’ व्हायला हवं. तिनं तिचा खरा गेम दाखवायला हवा.”करणच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. प्राजक्ता घरात पुढे कसा गेम खेळणार आणि करणच्या सल्ल्याचा कितपत परिणाम होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.