Ravindra Mahajani

रविंद्र महाजनी यांचा टॅक्सी ड्रायव्हर ते अभिनेते प्रवास…

मनोरंजन

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. एका सुपरस्टारचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हे दुर्देवं आहे.

रवीद्र महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे. त्यांच्या मृतदेह जमिनीवर पडलेला होता. दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने शरीर, चेहरा काळा पडला होता. त्यांनी पिवळ्या रंगाचं टिशर्ट घातलं होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी प्रोटीन पावडरचा डबा दिसत आहे. रविंद्र महाजनी बेडच्या खाली, डोक्यावर पडले आहेत. याशिवाय शेजारी काळ्या रंगाचं ऑइलही दिसत आहे. नेमकं त्यांच्या शेजारी असलेल्या काळ्या रंगाचं द्रव्य काय आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र चेहरा अत्यंत काळा पडला आहे. बेडशेजारी काही शूजही दिसत आहेत.

रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 1975 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मराठीतील विनोद खन्ना म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे चित्रपट विशेष गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले आहे. त्यांनी 1997 साली प्रदर्शित झालेल्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तसेच, या चित्रपटाची निर्मीतीही त्यांनीच केली होती.

रविंद्र महाजनी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. मात्र, ते टॅक्सी चालवतात या एका गोष्टीमुळे त्यांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले. विशेष म्हणजे ज्यावेळी ते अभिनेता म्हणून नावारुपाला आले त्यावेळी त्यांचे हेच नातेवाईक पुन्हा त्यांच्याशी चांगले वागू लागले. अभिनय क्षेत्रात काम करत असताना ते टॅक्सी चालक म्हणून काम करत होते. मुंबईत जवळपास 3 हून अधिक वर्ष ते टॅक्सी चालक म्हणून काम केले. मराठीतील राजेश खन्ना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या रवींद्र महाजनी यांनी एकेकाळी फसवणूक, कर्ज अशा संकंटांचा सामना केला आहे. रवींद्र महाजनी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा गश्मीर महाजनी देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांची मुलगी मात्र कधी समोर आलेली नाही.

रवींद्र महाजनी यांनी अभिनयाच्या जोडीला उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्यात त्यांची फसवणूक झाली आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. या वेळेस त्यांची दोन्ही मुलं मोठी होत होती. गश्मीर महाजनी त्या काळात शिक्षण घेत होता. पण कर्जात बुडालेल्या वडिलांना आणि घराला गश्मीरने सावरलं होतं.

एका मुलाखतीत गश्मीरने सांगितले की, ‘वयाच्या 15व्या वर्षी पुण्यात स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. त्यावेळेस आम्ही आर्थिक संकटात होतो. आमचं घर बँकेत गहाण होतं. 40-50 लाखांचं कर्ज होतं. डान्स अकॅडमीनंतर 2 वर्षांनी स्वत:ची कार्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली. त्यातून पॅन इंडिया इव्हेंट्स करायचो. 21 व्या वर्षी 5-6 वर्षात आम्ही 40-50 लाखांचं कर्ज फेडले. आमचं घर सोडवलं. 17 व्या वर्षी मी इनकम टॅक्स फाइल करायचो.’

गश्मीरचं त्याच्या आईबरोबर फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गश्मीरची आई त्याच्याबरोबर मुंबईत राहते. तर रवींद्र महाजनी मागील 8-9 महिन्यांपासून तळेगाव येथे भाड्याच्या घरात राहात होते. गश्मीर महाजनी सोशल मीडियावर सक्रीय असतो. अनेक रिअलिटी शोमध्ये काम करत असतो. तिथे प्रत्येक वेळी त्याची आई त्याच्याबरोबर असते. सोशल मीडियावरही गश्मीर आईबरोबरचे फोटो शेअर करतो. वडिलांचा कोणताही उल्लेख त्याच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत नाही. वडिलांपेक्षा आईबरोबर गश्मीरचा चांगला बॉन्ड आहे. रविंद्र महाजनी पुण्यात एकटे राहत असल्याचं समोर आलं आहे. तर गश्मिर आई आणि पत्नी-मुलासोबत मुंबईत राहतो.