छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात प्रोटोकॉल भंग? सुनेत्रा पवारांना थांबावे लागल्याने राजकीय चर्चा

महाराष्ट्र

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात कथित प्रोटोकॉल भंगाचा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी अचानक भाषण सुरू केल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काही क्षण ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना समोर आली आहे.

कार्यक्रमात भाषणांचा क्रम सुरू असताना आमदार शरद सोनवणे यांनी आपले मनोगत संपवून थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी आमंत्रित केले. याच वेळी सोनवणे यांच्या हातातील माईक घेत आशाताई बुचके यांनी “मला घोषणा द्यायची आहे,” असे सांगत थेट भाषणालाच सुरुवात केली. सुमारे दीड ते दोन मिनिटे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या व्यासपीठावर भाषणासाठी सज्ज होत्या; मात्र अचानक सुरू झालेल्या या भाषणामुळे त्या काही क्षण मागे उभ्या राहिल्या. त्यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव दिसून आल्याची चर्चा आहे. त्यांनी हातवारे करून भाषण थांबवण्याची सूचना केल्याचेही काही उपस्थितांनी सांगितले. अखेर आशाताई बुचके यांनी आपले भाषण आटोपते घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकृत मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, या घटनेमुळे कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग झाल्याची चर्चा रंगली असून राजकीय व सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी यावर टीका केली आहे, तर काहींनी हा प्रकार गैरसमज असल्याचे म्हटले आहे.