शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, करडे गावातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अवघ्या ७२ तासांच्या आत ताब्यात घेतल्यानंतर शिरुर पोलिसांनी वेगळाच पॅटर्न राबविला. शिरुर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत आरोपींची शिरुर शहर आणि करडे गावातुन धिंड काढली. यावेळी पोलिसांच्या कारवाईची परिसरात मोठी चर्चा रंगली असून, ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ असा स्पष्ट संदेश पोलिसांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतुन गुन्हेगारी प्रवृत्तींना दिला आहे.

करडे गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात जुन्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. हल्लेखोरांनी तीन राउंड फायर केल्याचे समोर आले होते. गोळीबारातून बचाव करण्यासाठी संबंधित तरुणाने पाण्यात उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे करडे गावासह संपुर्ण शिरुर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली होती. आरोपी दुसऱ्या जिल्ह्यात पसार झाले असतानाही शिरुर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार आणि आरोपींच्या हालचालींचा माग काढत काही आरोपींना अवघ्या ७२ तासांच्या आत ताब्यात घेतले.

त्यानंतर पोलिसांनी शिरुर शहर आणि करडे गावातील प्रमुख रस्त्यांवरुन आरोपींची धिंड काढली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गुन्हेगारांनी दहशत माजविल्यास ‘खाकी’ त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल, असा संदेश या कारवाईतुन देण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांच्या या भुमिकेचे स्वागत केले असून, गुन्हेगारांवर केवळ गुन्हे दाखल करुन न थांबता त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

करडे प्रकरणानंतर शिरुर पोलिस ॲक्शन मोडवर आले असुन ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल; अन्यथा खाकीचा ‘महाप्रसाद’ मिळेल’, असा संदेश पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आता शिरुर तालुक्यात गुन्हेगारीला मोठया प्रमाणात आळा बसणार आहे.

गुन्हेगारांना वचक बसवणार; प्रमोद क्षीरसागर… 

शिरुर तालुक्यात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच बाहेरच्या राज्यातुनही अनेक कामगार शिरुर तालुक्यात येतात. यातील काही व्यक्तींच्या संगतीत स्थानिक तरुण आल्याने काही वर्षात शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे. परंतु शिरुर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हेगारांना वचक बसावा यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. त्याची सुरवात आम्ही शिरुर मधुन केली असुन या पुढे जर एखाद्याने दुसऱ्यांदा पुन्हा गुन्हा केला तर त्याला असाच सार्वजनिक ‘महाप्रसाद’ दिला जाणार आहे.

प्रमोद क्षीरसागर 

पोलिस निरीक्षक 

(स्थानिक गुन्हे शाखा)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत