अजित पवारांच्या विमान अपघातावर रितेश देशमुखांची प्रतिक्रिया म्हणाले…

महाराष्ट्र

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता.

दरम्यान, तपास यंत्रणांनी आगीत ब्लॅक बॉक्सला बाधा झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, अत्यंत तीव्र आगीतही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्यासाठी तयार केलेला असतो. त्यामुळेच या प्रकरणातील संशय दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर अभिनेते रितेश देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रायगडावरील शिवजन्मोत्सव कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत विचारले असता, रितेश देशमुख म्हणाले, “एखादा मोठा नेता आपल्याला सोडून जातो ती जागा कधीच भरून निघू शकत नाही. अजितदादा हे लोकनेते होते. त्यांनी जनतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. ते एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील, असे कधी वाटले नव्हते.”

पुढे ते म्हणाले, “जिथे शंका आहे, तिथे उत्तरं मिळालीच पाहिजेत. कुठलाही प्रश्न अनुत्तरित राहू नये. प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं तर लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल. अन्यथा तोच संशय कायम राहील. कारण दादा हे अत्यंत मोठे आणि लोकप्रिय नेते होते.”दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येईल का, याबाबत उत्सुकता कायम आहे.