ठरलं तर मग मध्ये जबरदस्त कोर्टरूम ट्विस्ट! महीपतची कबुली, नागराजला आजन्म कारावास

मनोरंजन

सायली-तन्वी रहस्य उलगडणार कधी?

मुंबई: छोट्या पडद्यावर गेली तीन वर्षे टीआरपीमध्ये अव्वल स्थान राखणारी ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या नव्या वळणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही आठवड्यांपासून मालिकेचा टीआरपी घसरत असल्याची चर्चा होती. मात्र आता मेकर्सनी कथानकात टाकलेल्या दमदार ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

२२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं गूढ अखेर उलगडलं

रविराज आणि प्रतिमा यांच्या २२ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामागे नागराजचा हात असल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त होत होता. मात्र ठोस पुरावे नसल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. सध्या या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू असून महीपत हा या केसमधील मुख्य साक्षीदार आहे.

नव्या प्रोमोमध्ये अर्जुनचा धक्कादायक डाव समोर आला. साक्षी शिखरे जिवंत असल्याचा कोणताही पुरावा नसतानाही अर्जुन महीपतला ब्लॅकमेल करताना दिसतो. “साक्षीचे फोटो कोर्टात सादर करेन,” अशी धमकी देत तो महीपतवर मानसिक दबाव टाकतो.

अर्जुनचा गेम प्लॅन यशस्वी

लेकीला वाचवण्यासाठी महीपत काहीही करू शकतो, हे ओळखून अर्जुन त्याच्यावर चाल खेळतो. अर्जुन कोर्टात सत्य उघड करण्याचा इशारा देताच महीपतचा बांध फुटतो. तो कोर्टात सर्व गुन्ह्यांची कबुली देतो. एवढंच नाही तर या कटामागे नागराजचं मास्टरमाइंड असल्याचंही स्पष्ट करतो. रविराज किल्लेदारांशी थेट संबंध नसून नागराजनेच सुपारी दिली होती, असंही महीपत न्यायालयात सांगतो.या कबुलीजबाबानंतर न्यायालयाने महीपत आणि नागराज या दोघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर मालिकेतील संघर्षाला मोठं वळण मिळालं आहे.

आता सगळ्यांची नजर सायलीच्या रहस्यावर

कोर्टरूम ड्रामानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता सायलीच्या ओळखीभोवती केंद्रित झाली आहे. सायलीचं खरं नाव तन्वी आहे, हे सत्य कधी आणि कसं उघड होणार? हा मोठा प्रश्न आहे.याशिवाय आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अस्मिताचा नवरा हा साक्षी शिखरेचा बॉयफ्रेंड असल्याचं गुपित अजूनही अर्जुनला माहिती नाही. हे सत्य समोर आल्यानंतर कथानकात आणखी मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.

टीआरपी पुन्हा वाढणार?

मालिकेतील हा थरारक ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे. दमदार कोर्टरूम ड्रामा, अर्जुनचा हुशार डाव आणि महीपतची कबुली यामुळे ‘ठरलं तर मग’ पुन्हा एकदा रंगात आली आहे. येणारे भाग अधिकच रोमांचक असणार, यात शंका नाही.