विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची लोककलेने रंगतदार सुरुवात

मनोरंजन महाराष्ट्र

मुंबई: विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेने झाली. यावेळी श्री. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गोंधळ, पिंगळा आणि पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली.

कोकणातील प्रसिद्ध लोककलांचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. बालमित्र नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांनी गण, गवळण, तसेच पेंद्या-सुदाम जोडीचे सादरीकरण केले. नवलादेवी नाट्य मंडळ, उपळे, विरगांव (ता. लांजा) यांच्यातर्फे शाहिर संजय जोशी यांनी कोकणची पारंपरिक लोककला शक्ति तुरा सादर केली. याशिवाय, हातीसगावच्या भैरी जुगाई पालखी पथकाने पारंपरिक पालखी नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाच्या या रंगतदार सुरुवातीमुळे संपूर्ण वातावरण लोककलेच्या सुरेल आणि उत्साही रंगात न्हाऊन निघाले.