अल्पवयीन मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणारे तिघे जेरबंद

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून वडिलांनी मारहाण केल्यानंतर घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणाऱ्या तिघांना अखेर दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणातील तक्रारदार हे चालक असून ते कुटुंबासह गोरेगाव परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा स्थानिक खासगी शाळेत शिक्षण घेतो. ६ डिसेंबर २०२५ रोजी इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ करत असल्याने वडिलांनी त्याला रागाच्या भरात मारहाण केली होती. या घटनेनंतर मुलगा घरातून निघून गेला आणि बराच वेळ होऊनही घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांनी दिडोंशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात मुलगा घरातून निघून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकात गेल्याचे उघड झाले. तेथे कासिम मुर्शरफअली खान, महेंद्र विष्णू कश्यप आणि संजय राधेश्याम सचेती या तिघांनी त्याला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेले.राजस्थानमध्ये या मुलाला एका मंदिरात महाप्रसाद वाटप करण्याच्या कामावर ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून तीन महिन्यांनंतर मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले.

त्यानंतर मुलाला राजस्थानात नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर बोरिवली येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुलाचा ताबा त्याच्या पालकांकडे देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली.