तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या मोबाईल चोरी, पाकीटमारी आणि सोन्याचे दागिने चोरण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला यश मिळाले आहे. बाजार परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी दोन संशयित महिलांना रंगेहात ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनजागृती, लाऊडस्पीकरद्वारे सूचना आणि विशेष पेट्रोलिंग मोहिमेदरम्यान पोलिसांना दोन महिला संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. त्यांच्यावर लक्ष ठेवले असता त्या एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ कारवाई करत पोलिसांनी सारिका राजू जाधव (वय ४२) व साक्षी मेघराज पवार (वय ३०, दोघी रा. मंतरवाडी, हडपसर, पुणे) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्या बाजारात येण्याचे समाधानकारक कारण सांगू शकल्या नाहीत. पुढील तपासात त्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल व सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने बाजारात आल्याचे उघड झाले.
याप्रकरणी दोघींविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर करीत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी बाजारात खरेदी करताना मोबाईल, पर्स व मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.