कोकण महाराष्ट्राच्या विकासाचा कणा! दादांची विकासदृष्टी पुढे नेणार; सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

रोहा: “कोकण म्हणजे साक्षात देवभूमी असून इथल्या लोकांनी कष्टाने ही भूमी घडवली आहे. कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे,” असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले.

रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत विविध विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादा नेहमी कोकणाची बाजू घेत असत. इथल्या लोकांविषयी त्यांना अपार जिव्हाळा होता. त्यांच्या सहचारिणी म्हणून मला ते जवळून अनुभवायला मिळाले.”

त्या पुढे म्हणाल्या की, विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते नव्हेत, तर लोकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता निर्माण करून त्यांना सुख मिळवून देणे हा खरा विकास आहे. “अदिती ही माझी मुलगी असल्याने तिच्या मतदारसंघाकडे विशेष लक्ष राहील. दादांचे जसे कोकणावर प्रेम होते, तसेच माझेही कायम राहील,” असा शब्द त्यांनी दिला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनीही भावनिक भाषण केले. “दादांसारखा विकासपुरुष राज्याने अनुभवला. आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन आम्ही काम करत राहणार आहोत,” असे ते म्हणाले.

तटकरे यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात अजून अनेक पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत. निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोना काळात दादांनी कोकणासाठी मोठी मदत केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.“माझे वय ७१ वर्षे झाले, पण दादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही,” असे म्हणताना तटकरे भावुक झाले.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही भाषणात अजितदादांविषयी भावना व्यक्त करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. “दादांचे प्रेम जसे रायगडवर होते, तसेच लक्ष सुनेत्राकाकी यांचेही राहील,” असे त्या म्हणाल्या.या कार्यक्रमात कुंडलिका नदीकाठी पूर संरक्षण भिंत, नदी संवर्धन, गार्डन परिसरातील खाऊ गल्ली, स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे रक्तपेढी अद्ययावतीकरण, शिवसृष्टी शिल्प उभारणी, तसेच श्री धावीर महाराज मंदिरातील भक्तनिवास नूतनीकरण अशा विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले.

कार्यक्रमापूर्वी सुनेत्रा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले तसेच श्री धावीर महाराज मंदिरात दर्शन घेतले.यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, मुश्ताक अंतुले, मधुकर पाटील, विजया बाशिलकर, स्नेहल जगताप, नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत