शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) घोडनदी (शिरुर) येथील चौथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात आरोपीला दोषी ठरवत कारावास आणि लाखोंची नुकसानभरपाई अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना चांगलीच चपराक मिळाल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरु आहे.

या प्रकरणात फिर्यादी शंकर पांडुरंग राऊत यांनी ॲड किरण रासकर यांच्या मार्फत आरोपी दत्तात्रय मारुती पठारे यांच्याविरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दावा दाखल केला होता. धनादेश अनादर झाल्यानंतर न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीचा निकाल ११ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला.

सदर प्रकरणातील पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी दत्तात्रय मारुती पठारे यांना दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असुन फिर्यादीस ३ लाख ८० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हि रक्कम तक्रार दाखल झालेल्या तारखेपासुन प्रत्यक्ष वसुलीपर्यंत वार्षिक ९ टक्के व्याजासह दोन महिन्यांच्या आत अदा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार निश्चित मुदतीत रक्कम न भरल्यास आरोपीस अतिरिक्त दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शिरुर-घोडनदी न्यायालयाच्या या निर्णयामुळे चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये न्यायालय कठोर भुमिका घेत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करताना दिलेला धनादेश हा केवळ कागदाचा तुकडा नसून त्यामागे कायदेशीर जबाबदारी असते, हे या निकालातून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया कायदे तज्ज्ञांकडुन व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत