दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या उपक्रमांतर्गत आयोजन; अद्याप प्रदर्शित न झालेला चित्रपट पाहण्याची संधी
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट बाजार विभाग तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये नावाजलेल्या ‘जीव’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हा चित्रपट मंगळवार, दि. २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे. अद्याप व्यावसायिकरित्या प्रदर्शित न झालेला हा चित्रपट प्रथमच रसिकांसाठी दाखविण्यात येणार असल्याने सिनेप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दिग्दर्शक रवींद्र जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शिवाजी शेवाळे, बेबीताई सूर्यवंशी, किरण काकडे, दीक्षा उजागरे, आदर्श जाधव, समीर रामटेके, रवींद्र जाधव आणि उषा निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
कोकणातील आदिवासी समाजाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘जीव – द क्रीचर’ हा चित्रपट मृत्यूनंतर “जीव” पुन्हा कुटुंबात परत येण्याच्या पारंपरिक समजुतीभोवती फिरतो. परंपरा, सामाजिक दबाव आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष यामध्ये अडकलेल्या एका कुटुंबाची भावनिक आणि अंतर्मुख करणारी कहाणी या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष गौरव प्राप्त झाला असून कान चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाने निवडलेल्या मराठी चित्रपटांमध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे.
प्रदर्शनानंतर दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवादाचे आयोजन करण्यात आले असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम तपशील :
दिनांक : मंगळवार, २६ मे २०२६
वेळ : सायंकाळी ७ वाजता
स्थळ : लघु नाट्यगृह, तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई
प्रवेशाबाबत माहिती :
रसास्वाद मंडळाच्या सभासदांना प्रथम प्राधान्य
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर प्रवेश
दि. २१ मेपर्यंत पूर्व नावनोंदणी अनिवार्य
आसने शिल्लक असल्यास इतर रसिकांनाही प्रवेश
सभासद नोंदणी कार्यक्रमस्थळी करता येणार
अधिक माहितीसाठी संपर्क :
सुमेध – 8652215401
पंकज – 9702270821