मृत जवानांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत; १० दिवसांत मार्केट पूर्ववत करण्याचे शिंदेंचे निर्देश

महाराष्ट्र

ठाणे: ठाण्यातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवान आणि सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमी झालेल्या दोन अग्निशमन जवानांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली.

गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी ही माहिती दिली. त्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांना श्रद्धांजली अर्पण करत ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले.

यावेळी शिंदे यांनी गावदेवी मार्केटसह ठाण्यातील सर्व मार्केटचे तातडीने इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे सांगितले. तसेच मृत जवानांच्या कुटुंबियांना विम्याचे १२ लाख रुपये तातडीने देण्याबरोबरच ठाणे महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगीत व्यापारी आणि गाळेधारकांचे मोठे नुकसान झाले असून, मध्यरात्री आग लागल्यामुळे अनेकांना आपले साहित्य बाहेर काढता आले नाही. संपूर्ण मार्केट आगीत जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांना मार्केट परिसर तातडीने स्वच्छ करून आवश्यक इलेक्ट्रिकल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील १० दिवसांत गाळेधारकांना पुन्हा व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेवक मंदार कीणी, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख किरण नाकती तसेच शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

जखमी जवानांची रुग्णालयात जाऊन विचारपूस

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील Chhatrapati Shivaji Maharaj Hospital येथे भेट देऊन जखमी अग्निशमन जवानांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेत त्यांनी आवश्यक असल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देशही दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत