वाईच्या लघुकुंभमेळ्याने ‘दक्षिण काशी’ ची ओळख अधिक उजळली; मंत्री जयकुमार गोरे

महाराष्ट्र

मुंबई: सातारा जिल्ह्यातील वाई नगरीला “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जाते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या ऐतिहासिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या लघुकुंभमेळ्यामुळे वाई नगरी अधिक पावन झाल्याची भावना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. वाईच्या कुंभमेळ्याची महती संपूर्ण राज्यभर पसरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाई येथे आयोजित लघुकुंभमेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुजरातहून आलेले परमपूज्य महंत महादेवगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, युवा नेते विराज शिंदे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड, उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन घाटगे, मंदिर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, राजेंद्र पुजारी तसेच कृष्णा नदी सेवा समितीचे सदस्य काशिनाथ शेलार, सचिन सावंत, निलेश मोरे, प्रवीण जाधव, निखिल जाधव, संतोष जमदाडे, संग्राम पाडळे यांच्यासह अनेक साधुसंत, नगरसेवक, नगरसेविका व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून आयोजक, साधुसंत, नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक-नगरसेविका व कार्यकर्ते या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे हा धार्मिक सोहळा यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या भव्य कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातून कोट्यवधी भाविक येणार असल्याने विविध सुविधा उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करताना, पंतप्रधान Narendra Modi आणि मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी गुजरात अटल धामचे महंत महादेवगिरीजी महाराज म्हणाले की, अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते आणि हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळते. “या कुंभमेळ्यामुळे वाई तालुका सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी फीत कापून तसेच भगवान शंकर व महागणपती यांच्या प्रतिमांचे पूजन करून लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ करण्यात आला. आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. सकाळी अकरा वाजल्यापासून संतांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहिल्याच दिवशी सुमारे दीडशे साधूंनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित साधुसंत, महंत, नागरिक, पदाधिकारी आणि आयोजकांचे आभार मानण्यात आले तसेच या पवित्र उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत