मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
साम टीव्हीवरील ‘ब्लॅक अँड व्हाइट’ या कार्यक्रमात सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी सरनाईक यांना याबाबत थेट प्रश्न विचारला. “एकनाथ शिंदे आणि मातोश्रीवरून होकार मिळाला, तर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का?” असा सवाल त्यांना करण्यात आला.
यावर प्रताप सरनाईक यांनी राजकारणात ‘जर-तर’ कायम असते, असे सांगत या शक्यतेचे दरवाजे खुले ठेवले. एकनाथ शिंदे जी भूमिका घेतील, ती आम्हा सर्वांना मान्य असेल. त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असल्यास आम्ही त्याला होकार देऊ, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सरनाईक यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या स्थापनेचाही दाखला दिला. ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने एकत्र येऊन सरकार स्थापन करेल, असे कधी वाटले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात मंत्री होते. आम्हीही तो निर्णय मान्य केला होता, असे त्यांनी सांगितले.
राजकीय युती आणि आघाड्या कायमस्वरूपी टिकतीलच असे नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात युती आणि आघाड्या बदलत आल्याचा इतिहास आहे, असे सांगत सरनाईक यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत शक्यता खुली ठेवली.
दरम्यान, सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे भविष्यात पुन्हा मनोमिलन होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सध्या दोन्ही गटांच्या प्रमुख नेतृत्वाकडून अशा संभाव्य एकत्रीकरणाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.