श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी?
जेजुरी: “येळकोट येळकोट जय मल्हार!” या घोषणेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्तिभाव जागा होतो. मात्र आज एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे—खंडोबाच्या नावाने उधळला जाणारा भंडारा खरोखर शुद्ध हळदीचा असतो की रसायनांचा?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या चरणी शतकानुशतके हळद अर्पण करण्याची परंपरा आहे. पण अलीकडच्या काळात बाजारात विकल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेला भंडारा अनेक ठिकाणी रासायनिक रंग आणि भेसळीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये जेजुरीतील मिरवणुकीदरम्यान भंडाऱ्याने पेट घेतल्याची घटना घडली होती. काही भाविक जखमी झाले. ही घटना केवळ अपघात नव्हती, तर भंडाऱ्याच्या गुणवत्तेबाबतचा धोक्याचा इशारा होती.
अलीकडेच भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केमिकलयुक्त भंडाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. ही मागणी एका घटनेपुरती मर्यादित नसून संपूर्ण व्यवस्थेच्या शुद्धीकरणाची आवश्यकता अधोरेखित करते.
जेजुरीला जाणारा प्रत्येक भाविक गाभाऱ्यातील शुद्ध हळद आणि बाहेर विकल्या जाणाऱ्या अनेक भंडाऱ्यांमधील फरक सहज ओळखू शकतो. गाभाऱ्यातील हळद सुगंधी, नैसर्गिक आणि शुद्धतेची साक्ष देणारी असते. तर बाजारातील काही भंडारे कृत्रिम रंग, भेसळ आणि संशयास्पद घटकांनी भरलेले असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
याचे परिणाम केवळ श्रद्धेपुरते मर्यादित नाहीत. डोळ्यांची जळजळ, त्वचेचे विकार, श्वसनाचे त्रास आणि पर्यावरणीय प्रदूषण अशा अनेक समस्यांना भाविकांना सामोरे जावे लागू शकते.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. हजारो किलो भंडारा हवेत उधळला जातो, जमिनीत साचतो आणि पाण्यात मिसळतो. निसर्गालाच देव मानणाऱ्या भारतीय संस्कृतीत देवाच्या नावाने पर्यावरणाची हानी होणे ही चिंतेची बाब आहे.
आता वेळ आली आहे ती कठोर उपाययोजनांची. भंडारा उत्पादकांची नोंदणी, नियमित नमुना तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या आणि दोषींवर कठोर कारवाई अनिवार्य केली पाहिजे. “शुद्ध हळद – सुरक्षित भंडारा” हे अभियान राज्यभरातील खंडोबा देवस्थानांमध्ये राबविण्याची गरज आहे.
खंडोबाला भंडारा प्रिय आहे; पण तो श्रद्धेचा, शुद्धतेचा आणि भक्तीचा.
रसायनांचा नाही.
म्हणूनच आज पर्यावरण दिनी एकच हाक —
“येळकोट येळकोट जय मल्हार… पण भंडारा शुद्धच असू द्या सरकार!”