मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील परीक्षा व्यवस्थेतील सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप त्यांनी केला.
“आज राज्यातील युवकांच्या मनात एकच प्रश्न आहे. या सरकारला नेमके ‘फोडाफोडी’चेच वेड लागले आहे का?” असा सवाल करत मातेले यांनी राजकारणातील पक्षफोडीच्या आरोपांसह परीक्षा व्यवस्थेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर सरकारला धारेवर धरले.
नीट, विविध स्पर्धा परीक्षा, TET आणि इतर परीक्षांभोवती निर्माण झालेल्या वादांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, पालक कर्ज काढून शिक्षण देतात; मात्र परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारला प्रश्न विचारताना त्यांनी परीक्षा प्रक्रियेत वारंवार गोंधळ का होतो, विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे नुकसान भरून काढणार कोण, दोषींवर कठोर कारवाई कधी होणार आणि सुरक्षित व पारदर्शक परीक्षा प्रणाली कधी उभी राहणार, असे प्रश्न उपस्थित केले.”फक्त जाहिराती आणि घोषणांनी युवकांचा विश्वास मिळत नाही. पारदर्शक कारभार आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.