मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता आणि स्वातंत्र्यानंतरही दीर्घकाळ संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्यात आला नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आज आरएसएसला तिरंग्याबद्दल प्रेम वाटत असेल तर त्याचे स्वागतच आहे; ‘देर आये, दुरुस्त आये’, मात्र यामागे भाजपा आणि आरएसएसचा काही कावा नसावा, असा टोला त्यांनी लगावला.
टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ उपस्थित होते.
बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासह राज्यातील राजकीय, सामाजिक आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आगामी काळातील पक्षाची रणनीती आणि आंदोलनात्मक भूमिका यावरही विचारविनिमय झाला. यापुढे दर महिन्याला कोअर कमिटीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. SIR संदर्भातही बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसने आतापर्यंत ६५ हजार बीएलए-२ नियुक्त केले असून बीएलए-१ चीही नियुक्ती करण्यात आल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
‘सरकारच्या अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी जात-धर्माचा आधार’
भाजपाचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे, महागाई वाढली आहे, शेतकरी आणि बेरोजगारीचे प्रश्न गंभीर आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जात आणि धर्माच्या नावावर द्वेष निर्माण केला जात असून ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीने भाजपाचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. महायुती सरकारचा हा डाव काँग्रेस हाणून पाडेल आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल, असा इशारा सपकाळ यांनी दिला.
भाजपाचे आंदोलन हास्यास्पद : सपकाळ
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपाच्या खासदारांनी संसद परिसरात केलेल्या आंदोलनावरही सपकाळ यांनी टीका केली. भाजपाचे हे आंदोलन हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.
पेपरफुटीच्या प्रश्नावर दिल्लीतील जंतरमंतरसह देशभर तरुणांनी आंदोलने केली असताना त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला, पॅलेट गनचा वापर झाला आणि शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा सपकाळ यांनी केला. विद्यार्थिनींनाही अत्यंत वाईट वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी भाजपाच्या खासदारांनी आवाज उठवायला हवा होता, असे ते म्हणाले.
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर झालेला लाठीहल्ला चुकीचा असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले.
‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच खरे पळपुटे’
राहुल गांधी हे पळणारे नेते नसून लढणारे नेते आहेत, असा दावा करत सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत; मात्र चर्चेला सामोरे जाण्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘१२ वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान आणि चर्चेपासून पळ काढणारे अमित शाह हेच खरे पळपुटे आहेत,’ अशी टीका सपकाळ यांनी केली. राहुल गांधींना पळपुटे म्हणणारे खासदार अशोक चव्हाण यांनीच वस्तुस्थितीला सामोरे जाण्याऐवजी काँग्रेस पक्षातून पळ काढला, असा टोलाही त्यांनी लगावला.