अपघातग्रस्त बाईकस्वारांच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगडावरून महाडकडे परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईकस्वारांच्या मदतीसाठी तत्काळ आपला शासकीय ताफा थांबवून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.

रायगड किल्ल्यावरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदे महाडकडे रवाना झाले होते. महाड-पाचाड मार्गावरील निर्जन रस्त्यावर एका दुचाकीचा रस्त्याच्या कडेला साचलेल्या मातीमुळे घसरून अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ताफा थांबवून अधिकाऱ्यांना जखमींची विचारपूस करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर शिंदे स्वतः वाहनातून उतरून जखमी बाईकस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणाची आस्थेने चौकशी केली. दोघांना पाणी देण्यात आले तसेच ते कोणत्या गावचे आहेत, याची माहिती घेतली. दोघांनीही हेल्मेट परिधान केले असल्याने गंभीर दुखापत टळली होती. मात्र, मागे बसलेल्या तरुणाच्या पायाला दुखापत झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी ताफ्यातील रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावली.

दोन्ही जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देत, त्यांच्या उपचारांची माहिती स्वतःला फोनवर कळविण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. जखमींची योग्य व्यवस्था झाल्याची खात्री करूनच ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.सामान्य नागरिकांच्या अडचणीच्या वेळी तत्काळ मदतीला धावून जाण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा या घटनेतून दिसून आली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत