शिक्रापुर (ओमकार भोरडे) पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी चौक ते एमआयडीसी फाटा दरम्यान एका प्रवाशाला रिक्षातुन प्रवास करत असताना दोन अज्ञात रिक्षाचालकांनी शिवीगाळ, मारहाण करत मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास बाबासाहेब दराडे (वय ४०, रा. हतोली, ता. आष्टी, जि. बीड) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. हि घटना दि २४ जून २०२६ रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी परिसरात घडली. फिर्यादी हे सणसवाडी चौकातुन रिक्षामध्ये बसल्यानंतर रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने “प्रोटोस कंपनी येथे सोडतो” असे सांगून प्रवाशाला रिक्षात घेतले. मात्र, पुढे जात असताना त्यांनी रस्ता बदलून संशयास्पद हालचाली सुरु केल्या. फिर्यादीने दुसरीकडे का नेत आहात…? असा जाब विचारताच दोघांनी संताप व्यक्त केला.
या नंतर आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. रिक्षा थांबवून त्याला खाली उतरवुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरुन पसार झाले. त्यानंतर फिर्यादी रोहिदास दराडे यांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात धाव घेत दोन अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार राकेश मळेकर हे करत आहेत.
या घटनेमुळे रात्रीच्या वेळी पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुजोर रिक्षाचालकांकडून प्रवाशांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करुन अशा टोळ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या वादातून माय-लेकासह मेहुण्याला मारहाण