शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर महायुती सरकार ठाम; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

माळशिरस येथे जाहीर पक्षप्रवेश; विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश

मुंबई: महायुती सरकारच्या विकासाभिमुख आणि लोकहिताच्या कामांवर विश्वास व्यक्त करत अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून उर्वरित प्रश्नांवरही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे आयोजित जाहीर शिवसेना प्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे म्हणाले की, किरण सरनाईक अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर सरकारसोबत समन्वयाने काम करत आहेत. शिवसेनेची कार्यपद्धती आणि महायुती सरकारची जनहिताची भूमिका पाहून त्यांनी सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सरनाईक यांनी सातत्याने संघर्ष केला असून विधान परिषदेतही त्यांनी प्रभावीपणे आवाज उठवला आहे. सरकारने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित प्रश्नही लवकरच सोडविले जातील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षमपणे काम करत आहे. शेतकरी, कामगार, शिक्षक, युवक, महिला आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे हे सरकारचे ध्येय आहे. सरकारच्या कामावर विश्वास ठेवून विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होत आहेत.

यावेळी शिंदे यांनी मिश्कील टिप्पणी करत, “काल आमदार सचिन अहिर शिवसेनेत आले आणि आज किरण सरनाईक सहभागी झाले. शिवसेनेत आधी एक सरनाईक होते, आता आणखी एक सरनाईक आले आहेत,” असे म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

“आई-वडील जन्म देतात; मात्र संस्कार करण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे समाजात आई-वडिलांनंतर शिक्षकांचे स्थान सर्वाधिक मानाचे आहे,” असे सांगत त्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षकांच्या उर्वरित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासमवेत अधिवेशनादरम्यान विशेष बैठक घेण्यात येणार असून त्यातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, माळशिरस नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण, उबाठा गटाचे शहराध्यक्ष अशोक देशमुख तसेच डॉ. कृष्णा वक्ते, नरेश जाधव, पुंडलिक रहाटे, मायावती खंडारे, गजानन यन्नरवार, प्रमोद ढोले, प्रवीण परेकार, रमण टेकाम, महेंद्र गायकवाड, अजय थूल, प्रमोद गेडाम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील हमजा खान, अली खान, याया कुरेशी, उमेर खान, सोहेल सुभेदार, शामदेव कुमार आणि साहेब शेख यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला आमदार ॲड. किरण सरनाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत