राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी
सध्या काही लेखांमधून आणि पत्रकार संघटनांकडून ‘पत्रकार सन्मान योजना बंद करा’ अशी मागणी पुढे येत आहे. मात्र, या भूमिकेशी माझे ठाम मतभेद आहेत. योजना चुकीची वाटत असेल तर ती बंद करण्याऐवजी तिच्यात आवश्यक सुधारणा कराव्यात, जाचक अटी दूर कराव्यात आणि पात्र पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका राजन पारकर यांनी मांडली आहे.
पत्रकार सन्मान योजनेचा लाभ सध्या काही ज्येष्ठ पत्रकारांना मिळत आहे. त्यामुळे योजना सरसकट बंद करण्याची मागणी करण्याऐवजी ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, अशा पात्र पत्रकारांनाही या योजनेच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. काही पत्रकारांना मिळणारा आधार काढून घेणे हा समस्येवरील उपाय ठरू शकत नाही, असे पारकर यांनी म्हटले आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी ज्याप्रमाणे सातत्यपूर्ण संघर्ष करण्यात आला, त्याच पद्धतीने पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी आणि अन्यायकारक नियमांविरोधातही व्यापक लढा उभारण्याची गरज आहे. ‘योजना बंद करा’ अशी मागणी करण्यापेक्षा ‘योजना सुधारा, जाचक अटी हटवा आणि प्रत्येक पात्र ज्येष्ठ पत्रकाराला सन्मानाने आर्थिक आधार द्या’, अशी भूमिका पत्रकार संघटनांनी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांनी आयुष्यभर समाजातील प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा आवाज बुलंद केला. अशा पत्रकारांच्या उतारवयात त्यांचा आधार काढून घेण्याऐवजी त्यांचा सन्मान आणि हक्क दोन्ही जपणे आवश्यक आहे. पत्रकार सन्मान योजना अधिक व्यापक, पारदर्शक आणि पात्र लाभार्थ्यांना न्याय देणारी करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचेही पारकर यांनी म्हटले आहे.
“योजना बंद नको—जाचक नियम बंद हवेत!
पेन्शन बंद नको—पात्र पत्रकारांना न्याय हवा!” अशी स्पष्ट भूमिका राजन पारकर यांनी व्यक्त केली आहे.