शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर परिसरात सोशल मीडियावर खोटी ओळख निर्माण करून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा अश्लील व्हिडिओ तयार करत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडियावर बनावट ओळख तयार करून मुलीशी मैत्री केली. प्रेमाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केल्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. त्याचवेळी संपूर्ण प्रकाराचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते आपल्या मोबाईलमध्ये जतन केले.यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच आई-वडील आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेचा सातत्याने मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तपासादरम्यान आरोपी आणि पीडिता दोघेही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हा विधीसंघर्षित बालक असल्याने त्याला ताब्यात घेऊन बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे करीत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना विशेष सावधगिरी बाळगावी. ऑनलाइन ब्लॅकमेलिंग, धमक्या किंवा कोणत्याही प्रकारच्या अनुचित दबावाचा सामना करावा लागत असल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.