प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

महाराष्ट्र

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून काम करत असल्याने राजकीय स्वार्थापोटी आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी महापौर तथा शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केला.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून तपासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास पूर्ण सहकार्य करू आणि चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“या प्रकरणात घाणेरडे राजकारण पाहायला मिळत आहे. कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर आणि माझ्या पतीवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत,” असा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला.

‘नाव आले म्हणून अटक करायची असेल तर आदित्य ठाकरेंनाही अटक करणार का?’

केवळ एखाद्या व्यक्तीचे नाव प्रकरणात आले म्हणून अटक करायची असेल, तर दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचेही नाव आले होते, मग त्यांनाही अटक करणार का? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

‘संजय राऊत हे रश्मी ठाकरेंचे खासमखास आहेत का?’

उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही मीनाक्षी शिंदे यांनी टीका केली. “केवळ राजकीय फायद्यासाठी मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“परवा ठाण्यात पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बाजूला बसले असताना संजय राऊत तुम्हीच एकटे बोलत होता. मग आम्ही असे समजायचे का की तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास आहात?” असा खोचक सवाल करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. या प्रकरणात टीका करताना राजकारणाची पातळी खालावणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.

‘पूर्णेकर कुटुंबाला भडकवून राजकीय पोळी भाजू नका’

“माझ्या प्रभागातील प्रत्येक व्यक्तीशी माझा जवळचा संबंध आहे. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या दुर्दैवी आहे. प्रभागातील लोकप्रतिनिधी म्हणून मला या घटनेचे दुःख आहे. मात्र, या घटनेचे राजकीय भांडवल करून पूर्णेकर कुटुंबाला भडकवून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे गलिच्छ राजकारण आता थांबवावे,” असे आवाहन मीनाक्षी शिंदे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत