आईच्या संस्कारांमुळेच यशस्वी व्यक्तिमत्त्व घडते; मातृशक्तीचा गौरव समाजाचे कर्तव्य; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

मुरबाड: “प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी तिच्या आईचे संस्कार, तिची प्रार्थना आणि तिचे अथक कष्ट उभे असतात,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्याच्या वतीने मुरबाड येथे आयोजित ‘आई महोत्सव-2026’ आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी केले होते.सुनेत्रा पवार यांनी कविवर्य फ. मु. शिंदे यांच्या “आई एक नाव असतं…” या कवितेच्या ओळी सादर करत मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक यशामागे आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा त्याग असतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे भविष्यातील महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवक, कष्टकरी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने कार्यरत असल्याचे सांगत कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी पक्षाच्या कार्याचा गौरव करत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत विश्वास व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क, स्टेडियम आणि दिवंगत अजितदादांच्या नावाने मार्शल आर्ट अकॅडमी उभारण्याची मागणीही त्यांनी केली.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, मातृशक्ती आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यापूर्वी बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कॅ. आशिष दामले यांच्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुरबाड येथे प्रतिक हिंदूराव यांच्या कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाला आमदार दौलत दरोडा, नजीब मुल्ला, ज्योती हिंदूराव, किसनराव तारमळे, प्रतिक हिंदूराव, संजय तिवरे, प्रशांत एगडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत