रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया
नागपूर: 18 जुलै रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा आंदोलनाच्या’ पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया दिली. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला उद्धव ठाकरे गट व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावत, “या सर्व अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे स्पष्ट केले.
राऊत म्हणाले की, देशासमोर सध्या नीट, टीईटी घोटाळा आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणासारखे गंभीर प्रश्न आहेत. अशा वेळी महिला आरक्षण किंवा मतदारसंघ पुनर्रचनेच्या कथित चर्चांकडे लक्ष वळवले जात आहे. “आज दुपारी सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भूमिका स्पष्ट करतील,” असेही त्यांनी सांगितले.
जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, इस्लामपूरमधील लोकनियुक्त नगराध्यक्षाला नियमबाह्य पद्धतीने अपात्र ठरविण्यात आल्याच्या तक्रारीसंदर्भातच ही भेट झाली होती. त्याचा अन्य कोणत्याही राजकीय चर्चेशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही नेत्यांविषयी पसरवल्या जाणाऱ्या चर्चांमागे भाजप आणि शिंदे गटाचे राजकारण असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत.”
याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीवर टीका करत राऊत म्हणाले, “शिंदे चोरीचा माल म्हणजेच फुटीर खासदार घेऊन शाहांना भेटायला गेले. सामान्य माणसाकडे चोरीचा माल सापडला तर पोलीस कारवाई करतात, पण इथे मात्र त्याला सोन्याचा मुलामा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
18 जुलै रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या रामरक्षा आंदोलनासाठी नियोजित मैदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आल्याचा आरोप करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “मैदान मिळाले नाही तर आम्ही रस्त्यावर मंडप टाकू. रामाला रस्त्यावर आणण्याचे काम सरकारने केले आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.