मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र प्रदेश NSUI चे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सात दिवसांत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस, NSUI आणि समविचारी संघटनांसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत NSUI आणि युवक काँग्रेसने ‘जेन झी युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतीकात्मक गुणपत्रिका जाहीर करून राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील अपयशासाठी त्यांना “नापास” घोषित केले.
सागर साळुंखे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरल्याचा आरोप करत शिक्षकांवर बीएलओची अतिरिक्त कामे लादल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगितले. तसेच कॉलेज प्रवेश प्रक्रिया, बोगस नर्सिंग महाविद्यालये, आदिवासी विद्यार्थ्यांची कथित फसवणूक आणि विविध शुल्कांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनीही सरकारवर टीका करत, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असताना सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई होत असताना “थँक्यू मोदी” अभियान कशासाठी, असा सवाल करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
पत्रकार परिषदेत NSUI चे प्रदेश महासचिव ऋषीकेश खंडाळे यांनी शिक्षण विभागातील कथित अनियमिततांवर सादरीकरण केले. दक्षिण मध्य मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा ढवळे याही यावेळी उपस्थित होत्या.