पुणे जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सचिवपदी सुदर्शन दरेकर यांची नियुक्ती

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, समाजाप्रती उत्तरदायित्व जपणारा पत्रकार हा जागरूक आणि प्रभावी घटक मानला जातो. अशा परिस्थितीत युवा पत्रकारांना संघटित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा नुकतीच शिरूर येथे पार पडली.

संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शकील मणियार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शिरूर शहरातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुदर्शन दरेकर यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी प्रदान केले.

पत्रकारितेतील सक्रिय योगदान, सामाजिक भान आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत दरेकर यांना जिल्हा कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. नियुक्तीनंतर बोलताना सुदर्शन दरेकर यांनी संघटनेची ध्येय-धोरणे अधिक प्रभावीपणे राबविणे, ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करणे आणि पुणे जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

दरेकर यांच्या या नियुक्तीचे पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत