मुंढेंचा आणखी एक मोठा दणका! मुंबईतील 5 नामांकित क्रीडा क्लबचे FSSAI परवाने तात्काळ निलंबित

महाराष्ट्र

झुरळं, माशा, एक्सपायर अन्नपदार्थ आणि अस्वच्छ स्वयंपाकगृहामुळे FDAची कठोर कारवाई; राज्यभरात 81 आस्थापनांची तपासणी

मुंबई: राज्यात हॉटेल, डेअरी आणि उपहारगृहांवर धडक कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता मुंबईतील नामांकित क्रीडा क्लबांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे पूर्व) आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांचे FSSAI परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

एफडीएच्या तपासणीत संबंधित क्लबांच्या स्वयंपाकगृहांमध्ये झुरळं आणि माशांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ परिसर, एक्सपायर अन्नपदार्थांचा वापर आणि अन्नसाठवणुकीतील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये वैध FSSAI परवान्याशिवाय तृतीय पक्षाकडून केटरिंग सुरू असल्याचे आढळले, तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला परवान्याविना व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस बजावण्यात आली.

24 ते 27 जुलैदरम्यान एफडीएने राज्यभरातील 81 हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि धाब्यांची तपासणी केली. या मोहिमेत 11 परवाने निलंबित करण्यात आले असून 12 आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

याआधीही एफडीएने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृह सील करून मोठी कारवाई केली होती. ताकात मेलेली माशी आणि कांदा भजीत प्लास्टिकचा धागा आढळल्याने हे प्रकरण गाजले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राज्यभरात कठोर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत