शिरुर तालुक्यात बोअरवेलवरुन मंडप व्यावसायिकाला मारहाण करत गोळ्या घालण्याची धमकी 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथे ग्रामसभेने गावात बोअरवेल घेण्यास बंदी घातलेली असताना रात्रीच्या वेळी बोअरवेलची गाडी गावात आणल्याबाबत विचारणा करणाऱ्या मंडप व्यावसायिकाला तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “बंदूक घेऊन येतो, गोळ्या घालून जिवे मारतो,” अशी गंभीर धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि २९) जुलै रात्री घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC Police Station) पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्र भागचंद सुपेकर (वय ५०, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल संजय आवचिते, स्वप्निल संजय आवचिते, निखिल शंकर गुंजाळ आणि बोअरवेल चालक (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाभुळसर खुर्द (ता.शिरुर) गावातील ग्रामसभेत गावाच्या हद्दीत नवीन बोअरवेल घेण्यास बंदी घालण्याबाबत एकमताने ठराव करण्यात आला आहे. बुधवार (दि २९) रोजी रात्री सुमारे १० वाजून ४० मिनिटांनी सुपेकर हे त्यांच्या मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनजवळ आले होते. त्यावेळी त्यांना तेथे बोअरवेलची गाडी उभी असल्याचे दिसून आले.

गावात बोअरवेल घेण्यास बंदी असताना हि गाडी येथे कशासाठी आणली, अशी विचारणा सुपेकर यांनी बोअरवेल चालकाकडे केली. त्याचवेळी विशाल आवचिते, स्वप्निल आवचिते आणि निखिल गुंजाळ हे तेथे आले. “आम्हाला विचारणारा तू कोण…? हि काय तुझ्या बापाची जागा आहे का…?” असे म्हणत त्यांनी सुपेकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाद वाढल्यानंतर तिघांनी सुपेकर यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी बोअरवेल चालकानेही शिवीगाळ केली. निखिल गुंजाळ याने “तू येथेच थांब, मी बंदूक घेऊन येतो. तुला गोळ्या घालून जिवे मारतो. यापुढे कुठेही दिसलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप सुपेकर यांनी केला आहे. या घटनेनंतर सुपेकर यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

ग्रामसभेचा ठराव केवळ कागदावरच…?

गावाच्या हितासाठी ग्रामसभेत एकमताने बोअरवेलबंदीचा ठराव करण्यात आला असेल, तर त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. मात्र, रात्रीच्या वेळी गावात बोअरवेलची गाडी कशी आली, तिला कोणाची परवानगी होती आणि नेमकी बोअरवेल कोणाच्या जागेत घेण्यात येणार होती, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

एखाद्या नागरिकाने ग्रामसभेच्या ठरावाबाबत साधी विचारणा केली म्हणून त्याला मारहाण करणे आणि थेट गोळ्या घालण्याची धमकी देणे हा गंभीर प्रकार आहे. या घटनेमुळे बाभुळसर खुर्द परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करुर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत