२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर
मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीवर विश्वास ठेवत विकास आणि स्थैर्याच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे जनतेच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष सत्तासमीकरण यामध्ये तफावत निर्माण झाली, असे मत शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनतेच्या कौलाचा सन्मान व्हावा या भावनेतून २०२२ मध्ये शिवसेनेतील आमदारांनी वेगळी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारची स्थापना केली.
हे सरकार केवळ सत्ताबदल नसून जनतेच्या अपेक्षांनुसार विकासाला गती देण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा, उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख प्रशासन, विकासकामांना गती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगत, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी जनतेचा विश्वास आणि विकासाचा ध्यास हेच महायुतीचे प्रमुख ध्येय असल्याचे दिनेश शिंदे यांनी स्पष्ट केले.