सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा 

महाराष्ट्र

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी

मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या पुढील शतकभराच्या विकासाचा पाया ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिव्य मराठी आयोजित ‘वसा सिंहस्थाचा… वारसा नाशिकचा… गौरव महाराष्ट्राचा’ या सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ३२ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची माहिती दिली.

शिंदे म्हणाले की, सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, मुख्यमंत्री अध्यक्ष असलेली शिखर समिती आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. कुंभाचे व्यवस्थापन व्यक्तींवर नव्हे तर सक्षम संस्थात्मक यंत्रणेवर आधारित असेल.

सिंहस्थासाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांसह सुमारे ३२ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात येणार असून त्याचा दीर्घकालीन फायदा नाशिकला होईल, असे त्यांनी सांगितले.

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सिंहस्थाची सुरुवात होणार असून २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होईल. सुमारे १२ कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज असल्याने गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

साधूग्रामासाठी सुमारे १,४५० एकर क्षेत्र विकसित केले जाणार असून साधू-संत, आखाडे आणि भाविकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. “दिव्य, भव्य, सुरक्षित, स्वच्छ आणि पवित्र कुंभ” घडविण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी नाशिकसाठी ठाणे आणि पुण्याप्रमाणे युनिफाईड डीसीपीआर लागू करण्याची घोषणाही त्यांनी केली. “ऑन द स्पॉट डिसिजन” हीच सरकारची कार्यपद्धती असल्याचे सांगत सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत