मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन करण्यात आले. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या जयंतीनिमित्त कोणताही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याने साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्य, लोकशाहीर परंपरा आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान मोठे मानले जाते. त्यांच्या साहित्याने उपेक्षित, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या आयुष्याला शब्द दिले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय व्याख्यानमाला, शाहिरी कार्यक्रम, लोककला सादरीकरण किंवा अभिवादनपर सांस्कृतिक उपक्रम आयोजित होण्याची अपेक्षा होती.
मात्र, सांस्कृतिक कार्य संचालनालय किंवा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने कोणताही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक साहित्यिक, लोककलावंत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.
राज्य सरकार लोककला आणि लोककलावंतांच्या संवर्धनाचा पुरस्कार करत असताना, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे कार्य केवळ साहित्यापुरते मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, लोककलांना चालना मिळावी आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाने नियमित सांस्कृतिक उपक्रम राबवावेत, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून करण्यात येत आहे.