स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मनोरंजन

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी दिली जात आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडी कायम ठेवण्यासाठी वाहिनीकडून एकामागोमाग एक नवीन मालिका दाखल होत आहेत. आता 10 ऑगस्टपासून ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही नवी मालिका संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

या नव्या मालिकेच्या आगमनासोबतच स्टार प्रवाहवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर मालिकेचा प्रवास आता संपणार आहे.

मालिकेतील प्रमुख अभिनेत्री समृद्धी केळकर हिने सोशल मीडियावर सेटवरील शेवटच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. तिने पोस्टमध्ये लिहिले, “कृष्णा म्हणून शेवटचे काही क्षण… सेटवरची ही शेवटची रात्र, शूटिंग संपलंय. मी तुमचा निरोप घेते. माझं मन खरंच खूप भरून आलंय…” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही भावनिक प्रतिक्रिया देत मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेत समृद्धी केळकरसोबत अभिषेक रहाळकर मुख्य भूमिकेत होता. कृष्णा आणि दृष्यंत या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. दुपारी 1 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.

आता या मालिकेचा शेवटचा भाग लवकरच प्रसारित होणार असून, कथा कोणत्या वळणावर संपणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचवेळी ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या नव्या मालिकेकडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत