‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

राजकीय

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांवरून आता अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनकुळ्या’ असा करतात, मग यावर एकनाथ शिंदे काहीच का बोलत नाहीत? असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला.

मुंबईत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत सदावर्ते बोलत होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. “मनोज जरांगे ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते आक्षेपार्ह आहे. संविधान लागू झाल्यानंतर कोणालाही केवळ जात किंवा सामाजिक ओळखीच्या आधारावर इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा अधिकार नाही,” असे सदावर्ते म्हणाले.

‘इतर समाजाच्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही’

मनोज जरांगे पाटील यांनी इतर समाजातील नेत्यांबाबत कथितपणे अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत सदावर्ते यांनी भटक्या-विमुक्त, ओबीसी, मागासवर्गीय तसेच इतर समाजाच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याची भूमिका मांडली. “अशा प्रकारे कोणीही बोलत असेल तर त्याला कायदेशीर मार्गाने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

‘जरांगे यांचा संबंध टेंडर आणि रेती उपशाशी’

दरम्यान, सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोपही केले. “मनोज जरांगे हा धंदेवाईक आहे. पीडब्ल्यूडी आणि नगरविकास विभागाची टेंडर वाचण्याची त्याला सवय आहे. त्यांचा संबंध रेती उपशाशी आहे,” असा दावा सदावर्ते यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी पत्रकार परिषदेत कोणते पुरावे सादर केले, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

‘एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांनी भूमिका स्पष्ट करावी’

मनोज जरांगे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यातील फोनवरील संभाषणाचा संदर्भ देत सदावर्ते यांनी सामंत यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना मराठ्यांचे पुढारी म्हणून संबोधल्याचा उल्लेख करत, “मनोज जरांगे बावनकुळ्या असा उल्लेख करतात, हे अपमानास्पद बोलणे तुम्हाला चालते का?” असा थेट सवाल त्यांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना केला.

“एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात ‘ठाणे की रिक्षा’ हे गाणे ऐकल्यानंतर आग लागते; मग त्यांच्याच सहकारी नेत्याचा अशा प्रकारे उल्लेख केला जात असताना ते एक शब्दही का बोलत नाहीत?” असा सवालही सदावर्ते यांनी उपस्थित केला.

‘एकनाथ शिंदेंच्या पिक्चरचा सेकंड पार्ट जरांगे?’

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर टीका करताना सदावर्ते यांनी, “एकनाथ शिंदे यांच्या पिक्चरचा सेकंड पार्ट जरांगे आहेत का?” असा टोला लगावला. तसेच जरांगे यांच्या वक्तव्यांवर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, सदावर्ते यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या राजकीय वादाला आणखी धार आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत