कांद्याने भुजबळांचीच राजकीय कोंडी! लासलगाव बाजार समितीत सासरे-सुनेत सत्तासंघर्ष

महाराष्ट्र

मुंबई: लासलगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मंत्री छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी झाली आहे. भुजबळ समर्थकांमध्येच अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू असून, जयदत्त होळकर आणि सोनिया होळकर यांच्या माध्यमातून सासरे-सुनेतील संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गट भुजबळ समर्थक असल्याने नेमके कोणाच्या पारड्यात वजन टाकायचे, असा पेच भुजबळ यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीतील सत्तासंघर्षाला त्यामुळे राजकीय रंग चढला आहे. यापूर्वी भुजबळ यांनी दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून बाळासाहेब शिरसागर आणि त्यानंतर डिके जगताप यांना अध्यक्ष केले होते. मात्र, जगताप यांच्या कारकीर्दीत संचालकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप होत असल्याने नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पंढरीनाथ थोरे आणि बाळासाहेब क्षीरसागर यांच्या गटाने आपल्याकडे ‘मॅजिक फिगर’ असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे जयदत्त होळकर हे अध्यक्षपदासाठी इच्छुक असून तेही भुजबळ समर्थक आहेत. त्यांच्या विरोधात बाळासाहेब शिरसागर आणि पंढरीनाथ थोरे यांनी मोर्चेबांधणी केली असून, या गटाने जयदत्त होळकर यांच्या सून सोनिया होळकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले आहे.

दरम्यान, यापूर्वी अध्यक्षपदाची निवडणूक ऐनवेळी नाट्यमयरीत्या रखडली होती. निवडणुकीच्या काही मिनिटे आधी निर्णय अधिकारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निघून गेल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता ही निवडणूक कधी घ्यायची, याचा निर्णय ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.

लासलगाव बाजार समितीची अब्जावधी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि सत्तेचे राजकीय महत्त्व पाहता ही निवडणूक केवळ अध्यक्षपदाची राहिलेली नाही, तर भुजबळ समर्थकांमधील वर्चस्वाची लढाई ठरली आहे. दोन्ही बाजूचे नेते आपलेच समर्थक असल्याने भुजबळ यांनी सध्या तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

मात्र, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भुजबळ आपले राजकीय वजन नेमके सासरे जयदत्त होळकर यांच्या पारड्यात टाकतात की सून सोनिया होळकर यांच्या बाजूने उभे राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत